पीएमपीचे चाक खोलातच

‘परिसर’च्या अहवालात पीएमपीची पोलखोल

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन मोठ्या शहरांच्या आणि 50 लाखाहून अधिक नागरिकांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भार सांभाळणाऱ्या “पीएमपी’ला गेल्या काही वर्षांपासून समस्येचे ग्रहण लागले आहे. ब्रेकडाऊन, अपघात, रद्द होणाऱ्या फेऱ्या, प्रवाशांची घटती संख्या, किलोमीटरचे वार्षिक लक्ष्य पूर्ण न होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे योग्य वेळी पीएमपी प्रशासनाने लक्ष देणे आवश्‍यक असून वेळीच सुधारणा न झाल्यास त्याचा फटका दोन्ही शहरातील नागरिकांना व पीएमपीला बसणार असल्याचे चित्र “परिसर’ या खासगी संस्थेने पीएमपीवर तयार केलेल्या अहवालात दिसत आहे.

पीएमपी तोट्यात आहे, आवश्‍यकता आणि क्षमतेनुसार सेवा देऊ शकत नाही या सर्व बाबी सर्वांनाच माहीत आहेत. परंतु पीएमपीचे नेमकी वाटचाल कशी सुरू आहे यावर “परिसर’ नावाच्या एका खासगी संस्थेने विस्तृत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल पीएमपी आणि दोन्ही शहरातील नागरिकांसाठी चिंतेची कारणे स्पष्ट करत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमल) महसूल, प्रवाशी, फेऱ्या, बससंख्या या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर या दरम्यान प्रसिद्ध होत असलेल्या अहवालांचा अभ्यास करुन “परिसर’ने काही निष्कर्षही मांडले आहेत. खरे तर, त्या माध्यमातून प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. परिसरच्या पदाधिकाऱ्यांनी “पीएमपी’च्या अध्यक्षांपुढे अहवालाचे सादरीकरण केले आहे. पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरात “पीएमपी’चे मोठया संख्येंने प्रवासी आहेत. मात्र, विविध कारणांमुळे झपाट्याने त्यात घट होत असल्याचे परिसरच्या अहवालात समोर आले आहे.

आकड्यांमध्ये “पीएमपी’चा प्रवास
अहवालानुसार गेल्या दोन वर्षात जवळपास शंभर बसेस कमी झाल्या असून त्या मार्गावर आल्या नाहीत. 2017 मध्ये 1428 बस रस्त्यावर धावल्या होत्या. त्याचा 2018 मध्ये आकडा खालवला गेला असून प्रत्यक्षात 1 हजार 367 बसेस रस्त्यावर आल्या. अहवालानुसार केवळ 67 टक्‍के बसेस प्रवाशांच्या वाटेला आल्याचे निदर्शनास आले आहे. 2018 मध्ये मे, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर या कालावधीत बस रस्त्यावर येण्यास अनेक ब्रेक लागले होते. पीएमपीच्या दैनंदिन प्रवासाची संख्याही देखील कमी झाली आहे. 2017 मध्ये 10 लाख 6 हजार दैनंदिन प्रवाशांनी बसने प्रवास केला. एका वर्षांत दोन्ही शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली असल्याने प्रवासी संख्येत वाढ होणे अपेक्षित होते मात्र उलट यात घट झाली. 2018 मध्ये 10 लाख 2 हजार (दैनंदिन) प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे एकूण उत्पन्नालाही त्याचा फटका बसला आहे. त्यातच 2016 साली 110, 2017 मध्ये 127 आणि 2018 मध्ये 140 अपघात झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे पीएमपीच्या ताफ्यात 2016 ते 18 पर्यंत 12 नव्या बसेस, 200 मिडी बसेस व 22 तेजस्विनी आल्या आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूपच अपुरीच आहे. सुमारे 22 लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात केवळ 520 बसेस सार्वजनिक सेवा पुरवत आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरासाठी पीएमपीची सेवा अत्यत महत्वाची व उपयुक्‍त आहे. त्यामुळे पीएमपीने योग्य व निश्‍चित उद्दिष्टय ठेऊन त्यानुसार वेळीच वाटचाल करावी. मार्गावर बस वाढवण्याबरोबरच प्रवाशांच्या समस्या सोडवणे सुद्धा आवश्‍यक आहे. प्रवाशांना प्रवासात सुविधा मिळाव्यात हाच आमचा हेतू आहे.
-रणजीत गाडगीळ, पदाधिकारी, परिसर संस्था

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.