आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव; नयना गुंडे यांनी केली पाहणी
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून दोन जागांचा ताबा देण्यात आला आहे. आणखी तीन जागा मिळाव्यात, अशी पीएमपीएमएलची प्राधिकरणाकडे मागणी आहे. तथापि, प्राधिकरणाकडून पीएमपीएमएला मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्रालगतची आणखी एक जागा दिली जाणार आहे. त्याची पाहणी आज पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी केली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाला इलेक्ट्र्रिक बसेससाठी डेपो, पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी पीएमपीएमएलने प्राधिकरणाकडे पाच जागांची मागणी केली होती. प्राधिकरणाकडे रावेत (पेठ क्रमांक 29), भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र, पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रालगत (मोशी) पेठ क्रमांक 5 व 8 येथील जागा, वाकड (पेठ क्रमांक 38) आणि मोशी (पेठ क्रमांक 11) अशा पाच ठिकाणी जागांचा त्यामध्ये समावेश होता. संबंधित जागा विकसित करून हस्तांतर कराव्यात, अशी पीएमपीएमएलची मागणी होती. मात्र, प्राधिकरणाकडून त्यांना 11 महिन्यांच्या भाडेकराराने तीन जागा देण्याचे नियोजन करण्यात आले.
प्राधिकरणाने त्यांना रावेत – 8 हजार चौरस मीटर, भोसरी – 8 हजार 540 चौरस मीटर या दोन जागांचा ताबा पीएमपीएमएलला दिला आहे. औद्योगिक प्रदर्शन केंद्रालगतची पेठ क्रमांक 5 व 8 येथील(मोशी) 6 हजार 300 चौरस मीटर येथील जागा प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. त्याची पाहणी गुंडे यांनी केली. तसेच, लवकरात लवकर या जागेचा ताबा मिळावा, अशी मागणी प्राधिकरण प्रशासनाकडे केली आहे. पीएमपीएमएलकडून सीएनजी, डिझेल बसची नव्याने खरेदी केली जात आहे. त्याशिवाय, इलक्ट्रिक बसची खरेदीही होत आहे. त्यासाठी शहरामध्ये स्वतंत्र डेपो, पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक ठरणार आहे.