पोलिसांना पीएमपीचा मोफत प्रवास

ओळखपत्र बंधनकारक : इतर कर्मचारी आढळून आल्यास कारवाई

पुणे – महापालिका परिवहन सेवेच्या बसेसमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील आस्थापनेवरील कर्तव्यार्थ कर्मचाऱ्यांनाच मोफत प्रवास करता येणार आहे. मात्र, यामध्ये ग्रामीण पोलीस, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस (एसआरपीएफ) यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे वाहकांनी ओळखपत्रांची तपासणी करून इतर कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना पीएमपी प्रशासनाकडून वाहकांना देण्यात आल्या आहेत.

पीएमपी बसेसमधून कर्तव्यार्थ पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची मुभा देण्यात येते. या प्रवास खर्चापोटी राज्य सरकारच्या गृहविभागाकडून अनुदान दिले जाते. मोफत प्रवास उपलब्ध करून देताना करण्यात आलेल्या करारामध्ये काही अटी घालून देण्यात आल्या आहेत.

यामध्ये विशेषतः कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र बंधनकारक असून तो विशिष्ट परिक्षेत्रातील असावा, असे सांगण्यात आले आहे. यानुसार पीएमपी बसेसमधून केवळ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात येतो. यात पुणे ग्रामीण, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश नसल्याचे पीएमपी प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

ओळखपत्र तपासण्याच्या सूचना
मोफत प्रवासाच्या अधिसूचनेतील नियमांचे काही महिन्यांपूर्वी उल्लंघन झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासण्याबाबतच्या सूचना प्रशासनाने वाहकांना दिल्या आहेत. काही निवृत्त कर्मचाऱ्यांकडूनही याचा लाभ घेण्यात येत असल्याचे काही महिन्यांपूर्वी निदर्शनास आले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.