पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यास आणि “क्वारंटाइन’ झालेल्या कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची “विशेष रजा’ मिळणार आहे. याबाबत पीएमपी प्रशासनाने आदेश दिले असून, येत्या काळात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सध्या पीएमपीकडून केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना प्रवासाची मुभा दिली आहे. यामध्ये सफाई कामगार, पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आदींचा समावेश आहे. शहरात सुमारे 125 बसेसचे संचलन सुरू आहे.
याशिवाय रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका, संशयित रुग्णांना देखील पीएमपी बसेसमधून क्वारंटाइन सेंटरपर्यंत सेवा देण्यात येते. त्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका कायम आहे. यापूर्वी देखील पीएमपीच्या काही कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन व्हावे लागते. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून विशेष रजा देण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत कर्मचारी संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेरीस पीएमपी प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून, याबाबतचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
करोना संसर्ग झालेल्या आणि क्वारंटाइन व्हावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची विशेष रजा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्याची रजा खर्ची पडणार नाही. महापालिका प्रशासनाच्या धर्तीवरच हा निर्णय घेतला आहे.
– अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी