256 वाहक आणि 85 चालकांना “कंट्रोलर कम चेकर’ पदावर बढती
पुणे – सन 2013 सालच्या अस्थापना आराखड्यानुसार पीएमपीएमएल प्रशासनाने ताफ्यातील 256 वाहक आणि 85 चालकांना “कंट्रोलर कम चेकर’ या पदावर बढती दिली आहे. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या सुरवातीलाच पीएमपीएमएलकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेच्यावतीने 2013 मध्ये केलेल्या शिफारशींच्या आधारे पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) अस्थापना आराखडा तयार करण्यात आला होता. यानुसार पदोन्नतीसह इतर कामकाज सुरू होते. दरम्यान, तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी हा आराखडा रद्द करून नव्या आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, त्यांच्या निर्णयाला कर्मचारी संघटनेने विरोध केला. यानंतर, मुंढे यांच्या बदलीनंतर संचालक मंडळाने पुन्हा 2013 च्या अस्थापना आराखड्याला मंजुरी देत कामकाज सुरू केले. या सर्व घडामोडीत मागील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीसह इतर सर्व कामकाज रखडले होते. यावर सकारात्मक विचार करून पीएमपीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी पदोन्नतीसह इतर कामकाज मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने महामंडळातील वाहतूक विभागातील 5 हजार 218, वर्कशॉप विभागातील 1 हजार 94 आणि प्रशासन विभागातील 555 अशा एकूण 6 हजार 687 कायम सेवकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली. यावर आलेल्या हरकतींचा विचार करून ही यादी अंतिम केली. यातील पहिल्या टप्प्यात 341 चालक आणि वाहकांना कंट्रोलर कम चेकर या पदावर बढती दिली. यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी योगेश होले, मोतीराम रॉड्रीक्स, सुभाष गायकवाड यांनी काम करून प्रश्न मार्गी लावला.
पुणे महानगर परिवहन महामंडळातील 341 चालक आणि वाहकांना कंट्रोलर कम चेकर पदावर बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढील काळात इतरही कर्मचाऱ्यांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल