माहिती मागवली : प्रशासकीय पातळीवर हालचाली
पुणे – पीएमपीमध्ये मागील अनेक वर्षांपासून चालक, वाहक या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच बढती देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने 400 चालक आणि 800 वाहकांचे 31 डिसेंबर 2018 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीतील हजेरी आणि इतर कामकाजाचे रेकॉर्ड मागितले आहेत. याची तपासणी करुन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएल) गेल्या अनेक महिन्यांपासून सेवाज्येष्ठता, पदोन्नतीबाबतचे कामकाज रखडले आहे. काही महिन्यांपूर्वी हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणास्तव प्रशासनाला यश आले नाही. मात्र, पीएमपी प्रशासनाने दोन दिवसापूर्वी शहरातील सर्व डेपो मॅनेजर यांना पत्रव्यवहार करुन आगारातील चालक, वाहकांचे रेकॉर्ड मागितले आहे. कर्मचारी सातत्याने गैरहजर असल्यास याबाबतदेखील माहिती मागवण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांचे सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर बढती देण्यात येणार आहे. यासाठी समांतर आरक्षण, सेवाज्येष्ठता आदी बाबींचा विचार करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून सेवाज्येष्ठतेबाबत कामकाज होत नसल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहे. तर, याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू झाल्याने काही कर्मचाऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.