पीएमपी कर्मचाऱ्यांना बाप्प्पा पावला!

पुणे  – पीएमपीएमएलच्या तब्बल 10 हजार 200 कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा गणेशोत्सव खुशखबर घेऊन येणारा ठरला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्येच दिवाळी येत असल्याने दिवाळीपूर्वीच या कर्मचाऱ्यांना बोनस (बक्षीस) तसेच सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने शनिवारी घेतला.

याबद्दलची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यावेळी उपस्थित होते. या निर्णयाचा फायदा पीएमपीच्या तब्बल 10 हजार 200 कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पीएमपीकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीत हे बक्षीस तसेच सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यासाठी महापालिकेकडून पीएमपीच्या देयकातील रक्कम पीएमपीला उचल म्हणून दिली जाते. वर्षाच्या अखेरीस पीएमपीला दिल्या जाणाऱ्या संचलन तुटीमधून ही रक्कम वजा केली जाते.

मात्र, या वर्षी विधानसभा निवडणुका ऐन दिवाळीत असल्याने आचारसंहितेत हे बक्षीस तसेच सानुग्रह अनुदान देण्यात अडचण येण्याची शक्‍यता होती. त्यामुळे संचालक मंडळांने एक महिना आधीच हा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार, पीएमपीकडून तातडीने महापालिकेस उचलीच्या रकमेचे पत्र पाठविण्यात येणार असून स्थायी समितीकडून आचारसंहितेपूर्वी ही रक्कम देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. आचारसंहितेपूर्वीच सर्व मान्यता घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे संचालक मंडळाचे सदस्य आणि स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.