पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतुकीची धुरा सांभाळणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित ई-बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रवाशांच्या प्रतिसादाचा फायदा पीएमपीच्या तिजोरीसाठी करण्याचा मानस पीएमपी प्रशासनाचा दिसत आहे. याबाबत काही दिवसांत अधिकृत निर्णय होऊन पुढील काळात या बसेसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. साध्या बसेसच्या तुलनेत वातानुकूलित बसचे भाडे अधिक ठेवण्याच्या सरकारी नियमाचा आधार घेत ही भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे.
आजघडीला पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 200 बस आहेत. यामध्ये, 1 हजारहून अधिक बसेस सीएनजीवर तर, सुमारे 800 बस डिझेलवरच्या आहेत. यात 120 इलेक्ट्रीक बस आहेत. या ई-बसना प्रवाशांनी मोठी पसंती दिली आहे. मात्र, इंधनाचे वाढते दर पाहता पीएमपीएलला मोठा तोटा सहन करावा लागतो. यामुळे, पीएमपीएल प्रशासनाने संचालक मंडळाच्या बैठकीत तिकीट दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो अमान्य करण्यात आल्याने पीएमपीचा वाढता तोटा पाहता आता प्रशासनाने इलेक्ट्रीक बसची तिकीट दरवाढ करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे, पुढील काळात ई-बसने प्रवास करताना प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागतील.