पुणे – गेल्या अनेक दिवसांपासून पीएमपी बसचे संचलन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. सकाळच्या सुमारास वेळेत बस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून बस चालक डेपोतून संचलनासाठी बस वेळेत बाहेर काढतात का, यावर वॉच ठेवण्यासाठी पथकाची नेमणूक केली जाणार आहे.
पीएमपी बसचालक सकाळच्या सुमारास डेपोंमधून बस उशिरा बाहेर काढत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. त्याचा परिणाम वेळापत्रकावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमणूक केलेले पथक शहरातील 13 डेपोंना भेटी देऊन पाहणी करणार आहे. यादरम्यान दोषी आढळणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात पीएमपीच्या डेपोला रोज अचानक भेट देऊन नेमणूक केलेले पथक बस चालक किती वाजता बस संचलनासाठी नेतात, याची नोंद ठेवणार आहेत. यामध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
– अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल