पीएमपी बसेसच्या पायऱ्यांची बिकट अवस्था

पुणे – बसमधून उतरताना सावधपणे उतरा… उतरताना खाली पहा आणि त्यानंतर उतरा… असे तुम्ही करत नसाल तर सावधान… बसमधून उतरतेवेळी तुम्ही पायरीचा अंदाज न घेता उतरल्यास तुम्हाला इजा होऊ शकते. याचे कारण आहे, बसेसच्या पायऱ्यांची बिकट अवस्था.

ब्रेकडाऊन, धूर, बस आणि प्रवाशांचा संख्येचा नसलेला ताळमेळ, पावसाळ्यामध्ये देखील बसेसची बिकट अवस्था अशा एक ना अनेक समस्यांमुळे प्रवासी पीएमपीबाबत पुन्हा एकदा नाराजी व्यक्‍त करत आहेत.

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या समस्या सुटण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे. लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या पीएमपीच्या पायऱ्या आता प्रवाशांचे नाराजीचे आणि चिंतेचे कारण ठरत आहेत. बसच्या पुढील दरवाज्यांमध्ये असणाऱ्या पायरीवरून पाय घसरण्याची शक्‍यता असल्याने, प्रवाशांकडून “प्रवासाबाबत प्रश्‍नचिन्ह’ उपस्थित करण्यात येत आहे. बसमधून प्रवासी उतरण्याच्या दारामध्ये असणारी पायरी “सुस्थितीत’ नसल्याने प्रवाशांना गंभीर दुखापत होण्याची शक्‍यता असते. विशेषत: पीएमपीच्या जुन्या बसेसमध्ये हा धोका जास्त आहे. अनेक बसेसमध्ये पुढील दरवाज्यातील अर्ध्या पायऱ्या घासलेल्या असतात, त्यांचे पत्रे व्यवस्थित नसतात, पायऱ्या अरुंद असतात, त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा पाय घसरण्याची, पडण्याची शक्‍यता अधिक असल्याने अपघात घडत असल्याचे प्रवासी सांगतात. यावेळी वाहक आणि चालकांचे सहकार्य प्रवाशांना मिळत नाही. अनेकदा हातामध्ये पिशव्या, बॅग आदी गोष्टी असतात. बसेसमध्ये गर्दी असते, पावसाळ्यामध्ये बसेसच्या पायऱ्यांवर पाणी असते, चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशांचा विचार करता “दरवेळी पायरी पाहून उतरायचे का’ असा सवाल प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पीएमपी प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नाही. प्रवाशांनी बिकट अवस्थेत असणाऱ्या पायरीचा फोटो आणि बस क्रमांक कळविल्यानंतर पीएमपी प्रशासनाकडून दखल घेतली जाते. त्यामुळे प्रवाशांनी “प्रत्येक बसचा क्रमांक कळवायचा का?’ असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

डेपोमध्ये नियमित पाहणी होते
प्रवाशांनी सांगितल्यानंतर किंवा पीएमपी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्वरित या घटनांची दखल घेतली जाते. बसेसची पूर्ण तपासणी केल्यानंतरच आरटीओकडून पासिंग होते. त्याचबरोबर डेपोमध्ये नियमित होणाऱ्या देखभाल-दुरुस्तीमध्ये याची पाहणी केली जाते. संबंधित घटनेची पीएमपी प्रशासनाकडे माहिती मिळाल्यावर तातडीने दखल घेतली गेली. अशा घटना क्वचित घडतात, त्या घडू नयेत यासाठी पीएमपी प्रशासन उपाययोजना करत आहे, अशी माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पीएमपीच्या अनेक बसेसमध्ये प्रामुख्याने पुढील दरवाजातील पायऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. मी बस क्रमांक 1627 मधून प्रवास करताना, माझ्यासह अनेक प्रवासी गंभीर दुखापतीतून सुदैवाने वाचले. उंची आणि रुंदी पाहता पायऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित नाहीत. पावसाळ्यामध्ये यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. याबाबत पीएमपी प्रशासनाने बसेसची तपासणी करून त्वरित कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, वारंवार तक्रार करूनही प्रशासन उदासिन आहे.
– सतीश मेहता, प्रवासी

Leave A Reply

Your email address will not be published.