पीएमओचे पत्र व्हायरल करणारा अधिकारी निलंबित

नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाने नॅशनल हायवे ऍथॉरिटीला त्यांचा गाशा गुंडाळण्याची व सर्व विकास प्रकल्प थांबवण्याची सूचना केल्याचे पत्र मध्यंतरी चांगलेच गाजले होते. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारने निलंबित केले आहे. त्याविषयीची माहिती परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीच आज पत्रकारांना सांगितली. तसेच नॅशनल हायवे ऍथॉरिटीवर पंतप्रधानांचा विश्‍वास कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. या ऍथॉरिटीतर्फे अनेक विकास प्रकल्प देशात राबवले जात असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

या घटनेच्या संबंधात माहिती देताना त्यांनी सांगितले की कोणी तरी एका इसमाने देशाच्या विकासकामांच्या संबंधात पंतप्रधानांना तेराशे पानांचे निवेदन सादर केले होते. पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेनुसार हे पत्र त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी नृपेंद्र मिश्रा यांनी केंद्र सरकारच्या आठ विभागांना त्यांचा अभिप्राय कळवण्यासाठी पाठवले होते. ते पत्र परिवहन विभागालाही प्राप्त झाले होते.

या अधिकाऱ्याने हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे त्यातून खोट्या बातम्या प्रसृत करण्यात आल्याने सरकारने या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, असे गडकरी यांनी नमूद केले. नॅशनल हायवे ऍथॉरिटी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून आम्ही विविध प्रकल्पांसाठी निधी जमवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करीत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. आमच्याकडे पैशाची कमतरता नाही. या वर्षाच्या अखेरीला आम्ही पाच लाख कोटी रुपयांचे प्रकल्प जाहीर करणार आहोत, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×