PMJAY Yojana Gujrat | रुग्णांचा जीव वाचवणारा मानवी रूपातील देव म्हणून डॉक्टरांकडे पहिले जाते. मात्र हेच डॉक्टर आता सरकारी योजनेतील पैसा लाटण्यासाठी रुग्णांच्या जीवावर उठल्याचे प्रकरण समोर आले आहे. अहमदाबादमधील ख्याति मल्टिस्पेशालिटी या खाजगी रुग्णालयात सरकारी आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेताना दोन रुग्णांच्या मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
गेल्या तीन वर्षांत या रुग्णालयात सरकारी योजनांतर्गत उपचार घेतलेल्या ३८४२ रुग्णांपैकी ११२ जणांचा उपचारादरम्यान किंवा त्यानंतर मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारत पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये दोन पीएमजेएवाय (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) लाभार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान रुग्णालयाने विनाकारण अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे.
अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया हृदयातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी केली जाते. मात्र, रुग्णालयाने ग्रामीण भागात मोफत तपासणी शिबिरे आयोजित करून पीएमजेएवाय कार्डधारकांना अँजिओप्लास्टी करण्यास प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे.
रुग्णांना “इमर्जन्सी” स्वरूपात दाखल करून सरकारकडून त्वरीत मंजुरी मिळवली जात होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
यासाठी रुग्णालयाने सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय पाटोलिया, सीईओ राहुल जैन, आणि संचालक चिराग राजपूत यांचा समावेश आहे. तर, अध्यक्ष कार्तिक पटेल आणि संचालक राजश्री कोठारी हे अद्याप फरार आहेत. | PMJAY Yojana Gujrat
सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान रुग्णालयात जवळपास ८५०० रुग्णांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णालयाचे आर्थिक व्यवहारही संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, आर्थिक अहवालात 1.5 कोटी रुपयांचे नुकसान दाखवले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया न केलेल्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. आरोपींवर खुनाचा आरोप, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि आर्थिक फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरकारच्या आरोग्य योजनेच्या नावावर लाखो रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस येत असल्याने संबंधित रुग्णालय व यंत्रणांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. | PMJAY Yojana Gujrat