पुणे : अर्धा गणेशोत्सव संपल्यानंतर पालिकेला जाग

विसर्जनाच्या माहितीसाठी फलक लावण्यास सुरुवात

पुणे – शहरात पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर शहरातील विसर्जन हौद आणि घाटांवर फिरत्या विसर्जन हौदांची तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची माहिती असलेले फलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे, शहरात स्थिर विसर्जन हौद न ठेवण्याचा निर्णय झाला असला तरी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच हे फलक का लावलेले नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यंदा गौरीसोबतच पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले आहे. मात्र, नागरिकांना विसर्जनासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधांची माहितीबाबत जनजागृती करण्यात पालिका प्रशासनाने केलेल्या दिरंगाईने अनेक भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.

मागील वर्षी गणेशोत्सवानंतर शहरात मोठ्या प्रमाणात करोनाची लाट वाढल्याने यंदा महापालिकेने शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घरीच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे यासाठी 200 टन अमोनियम बायोकार्बोनेटच्या वापरासह फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुमारे 60 वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली असून स्थानिक पातळीवर काही ठिकाणी नगरसेवकांनी हौद उपलब्ध करून दिले आहेत.

मात्र, पालिकेस सलग तीन दिवसांची सुट्टी असल्याने पालिकेकडून या नियोजनाची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. त्याचा फटका शहरात दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाला बसला त्यानंतरही पालिकेकडून शहरातील विसर्जन घाटांवर याबाबत माहिती फलक लावण्यात आले नाहीत त्यामुळे पाचव्या दिवसाच्या विसर्जनालाही त्याचा फटका बसला.

त्यानंतर आता अचानक जागे झालेल्या महापालिकेच्या काही क्षेत्रीय कार्यालयांनी पाचव्या दिवसाच्या विसर्जनानंतर विसर्जन घाटांवर विसर्जनाची माहिती असलेले फलक लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयासह काही इतर क्षेत्रीय कार्यालयांचा त्यात समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.