बांधकाम व्यावसायिक, गृह खरेदीदारांना दिलासा
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जमीन, सदनिका यांचे वार्षिक बाजारमूल्य दर अर्थात रेडीरेकनरचे दर पुढील आदेशापर्यंत “जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील वर्षीचे (2019-20) दर सध्या चालू आर्थिक वर्षात कायम राहणार आहेत. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारकडून दरवर्षी दि. 1 एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र, महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी करोना संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. या पार्श्वभूमीवर 2020-21 या आर्थिक वर्षाचे रेडीरेकनरचे दर दि. 1 एप्रिल 2020 ते दि.31 मे 2020 पर्यंत “जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला होता. मागील दोन वर्षी रेडीरेकनरमधील दर “जैसे थे’ ठेवत राज्य शासनाने नागरिकांना दिलासा दिला होता.
यंदा मात्र पुढील वर्षीच्या (2020-21) रेडीरेकनरच्या दरात मुद्रांक शुल्क विभागाकडून 3 ते 18 टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहरात किमान दहा टक्क्यांनी, तर पुणे जिल्ह्यात काही भागात 15 टक्क्यांपर्यंत ही वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. नोंदणी विभागाकडून यंदा सर्वाधिक वाढ ही ग्रामीण भागात करण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीत झालेल्या सदनिका, दुकाने यांच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारांच्या आधारे तीन ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे.
मात्र ज्या ठिकाणी खरेदी-विक्री व्यवहार नाहीत. त्याठिकाणी अथवा त्या भागात वाढ केली नसल्याचे मुद्रांक विभागातील सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव मार्चमध्ये पाठवण्यात आला होता. त्यावर राज्य शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनरचे दर एप्रिल ते मे या दोन महिन्यासाठी “जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदत समाप्त होत आल्याने नोंदणी विभागाने पुढील निर्णयासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन मागविले होते. त्यास राज्य सरकारने पुढील आदेश देईपर्यंत हे दर “जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.