मुंबई : वैद्यकीय आणीबाणीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकला भेटून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकेल, असे रिझर्व्ह बॅंकेने उच्च न्यायलयात मंगळवारी सांगितले. तसेच लग्न, शिक्षण यासारख्या आकस्मिक खर्चासाठी 50 हजारांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकेल.
रिझर्व्ह बॅंकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील ठेवीदारांवर रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याविरोधात उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. त्याला उत्तर देताना रिझर्व्ह बॅंकेने प्रतिज्ञा पत्र दाखल केले. त्यात ही माहिती देण्यात आली.
रिझर्व्ह बॅंकेचे वकील यंकटेश धोंड यांनी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि आर. आय. छगला यांच्या खंडपीठाला सांगितले की, अशा आणिबाणीच्या स्थितीत असलेल्या ठेवीदारांनी बॅंकेने नेमलेल्या प्रशासकाला भेटून एक लाखापर्यंतची रक्कम काढता येईल. हे निर्बंध बॅंक आणि त्यांचे ठेवीदार यांच्या हितासाठी आवश्यक आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत.
आर्थिक गेैव्यवहारामुळे पीएमसी बॅंकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध 23 सप्टेंबर रोजी लागू केले आहेत.