नवी दिल्ली : पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने घातलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना अनेक समस्यांना सामाना करावा लागत आहे. याच दरम्यान पीएमसीच्या एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बॅंकेविरोधात आंदोलन करणाऱ्या खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. या खातेधारकाचे पीएमसी बॅंकेच्या खात्यावर 90 लाख रुपये जमा आहेत.
#Mumbai: 51-year-old Sanjay Gulati, a Punjab and Maharashtra Co-operative (PMC) Bank depositor passed away yesterday after taking part in a protest rally by depositors. #PMCBank pic.twitter.com/p9Z3t5BlzW
— ANI (@ANI) October 15, 2019
पीएमसी बॅंकेवर लादलेल्या निर्बंधाविरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ओशिवरातील तारापोरेवाला गार्डनजवळ राहणारे संजय गुलाटी हे सहभागी झाले होते. आंदोलन संपल्यानंतर रात्री ते घरी गेले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संजय गुलाटी हे जेट एअरवेजमध्ये इंजिनिअर होते. काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज बंद पडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले होते. पीएमसी बॅंकेमध्ये त्यांचे खाते असून त्यामध्ये 90 लाख रुपये होते. मात्र बॅंकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे ते चिंतेत आले होते. अशातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना त्यांच्या खात्यातील रक्कम काठणे कठीण झाले आहे. त्यामुळे आरबीआयने पीएमसी बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 40 हजार रुपये केली आहे. ग्राहकांना आता सहा महिन्याच्या कालावधीत 40 हजार रुपये काढता येणार आहे. आतापर्यंत ही मर्यादा फक्त 25 हजार रुपये होती.