पुणे – शहरात “पे ऍन्ड पार्क’ धोरणाला मान्यता मिळाली असताना अद्याप या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत चालढकल केली जात आहे. आता तर ही योजना विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंडाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“पे ऍन्ड पार्क’ ही योजना सुरुवातीपासूनच “नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने’ अशी झाली आहे. ही योजना राबवायचीच नव्हती त्यामुळे त्यावर अनेक खो घालायचे प्रयत्न करण्यात आले. हा रस्ता नको, तो नको, प्रायोगिक तत्त्वावर करू, अमुक रस्ताच करू, समितीही नेमली वगैरे वगैरे. एवढे सगळे करूनही अद्याप त्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पार्किंग धोरण तयार केले. या धोरणाला मुख्यसभेने मान्यता दिली; परंतु अद्याप धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शहरामध्ये प्रायोगिक तत्त्वावर 5 रस्त्यांवर “पे ऍन्ड पार्क’ करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. गेल्या वर्ष भरापासून सत्ताधाऱ्यांना पाच रस्ते शोधता आले नाहीत.