ब्रिक्‍स परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार

नवी दिल्ली : ब्राझीलमधे ब्रासीलिया येथे बुधवारी सुरु होणाऱ्या 11 व्या ब्रिक्‍स शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्‍स व्यापार फोरममधे उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांसमवेत मोठे व्यापार प्रतिनिधी मंडळही रवाना होईल अशी अपेक्षा आहे. ब्रिक्‍स व्यापार फोरममधे पाच सदस्य राष्ट्रांच्या उद्योग क्षेत्रातले प्रतिनिधी उपस्थित राहतात.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधान स्वतंत्र द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. ब्रिक्‍स व्यापार फोरमच्या समारोपाच्या सत्रात तसेच ब्रिक्‍स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

ब्रिक्‍स अंतर्गत सहकार्य आणि ब्रिक्‍स समूहाचा आर्थिक विकास यावर ब्रिक्‍सच्या पूर्ण सत्रात ब्रिक्‍स नेत्यांची चर्चा होईल. ब्रिक्‍स नेत्यांच्या बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. ब्राझिलियन ब्रिक्‍स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेंट बॅंकेचे अध्यक्ष यावेळी आपला अहवाल सादर करतील अशी अपेक्षा आहे.

यानंतर व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सीमध्ये ब्रिक्‍स सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. परिषदेच्या समारोप प्रसंगी संयुक्त घोषणापत्रही जारी करण्यात येणार आहे. ब्रिक्‍स अंतर्गत पाच महत्वाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र आल्या असून जागतिक लोकसंख्येच्या 42 टक्के लोकसंख्येचा या अंतर्गत समावेश आहे तर जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनाअंतर्गत ब्रिक्‍स समुहाचा 23 टक्के वाटा आहे तसेच जागतिक व्यापारात या समूहाचा 17 टक्के वाटा आहे.

नेते आणि मंत्री यांच्या बैठकीद्वारे परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा आणि व्यापार, वित्त, आरोग्य, शिक्षण, कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान आणि दळण-वळण माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीद्वारे सहकार्य हे ब्रिक्‍स सहकार्याचे दोन स्तंभ आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.