भारतातील कोरोना लसीविषयी पंतप्रधान म्हणाले…

नवी दिल्ली : देशाचा आज 74 वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाने सगळ्यांवर मर्यादा आल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच करोना काळात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. 130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

कोरोनावर लस कधी येणार हा सवाल आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. भारतात या लसींची स्थिती काय आहे, याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनावरची लस कधी होणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. भारतात एक दोन नव्हे तर तीन-तीन लसी प्रगतीपथावर आहेत. जेव्हा वैज्ञानिक चाचण्या पूर्ण होतील तेव्हा वेगाने उत्पादन होऊन ते लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचा आराखडा तयार आहे, असे ते म्हणाले. कोरोना मोठे संकट आहे, मात्र हे संकट इतकं मोठं नाही की ते आपल्या आत्मनिर्भर भारताच्या प्रवासाला रोखू शकेल, असे मोदी यावेळी म्हणाले.

ते म्हणाले की, जे लोक विस्तारवादाच्या भूमिकेत मग्न होते, त्यांनी सर्व जगाला दोन महायुद्धांमध्ये होरपळून टाकलं. मात्र अशा कालखंडातही भारतानं स्वातंत्र्यांची लढाई चालू ठेवली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलं की, सर्व कोरोना वॉरिअर्सना मी नमन करतो. अनेकांनी प्राणही गमावले. मला विश्वास आहे की आपण विजयी होणारच. कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता, डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, ऍम्ब्युलंस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक 24 तास सातत्याने काम करत आहेत, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.