नवी दिल्ली – देशात करोना विषाणुंचे काही संशयित रूग्ण आढळून आल्याने या संबंधात निर्माण झालेल्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला. या संबंधात त्यांनी एका ट्विटर संदेशात म्हटले आहे की विविध मंत्रालये आणि राज्य सरकारे या संबंधात समन्वयाने काम करीत आहेत.
विदेशातून भारतात येणाऱ्या व्यक्तींची सर्वत्र कसून तपासणी केली जात आहे असेही त्यांनी नमूद केले. आग्रा शहरातील काही प्रवाशांची तपासणी करण्यात आली असता सहा जणांना या विषाणुंची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिल्लीतील एका करोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना हीं बाधा झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सहा संशयीत करोनाग्रस्त रूग्णांना सफदरजंग रूग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमूने पुण्याच्या एनआयव्ही संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.