वर्धा येथील सभेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’वर मोदींची सडकून टीका

वर्धा – राज्यात सत्तेत असताना सुशिल कुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला. इंग्रजांनीही कधी हिंदूंसाठी असा शब्द वापरला नाही. काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला असून त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. ही गोष्ट आता काँग्रेसच्या नेत्यांनी देखील समजली आहे. त्यामुळेच त्यांचे नेते जिथे अल्पसंख्याक मतदार जास्त आहेत तेथे निवडणूक लढवत आहेत, असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला.

तसंच ”हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसमुळे आला. काँग्रेसमुळे देशातील हिंदू बदनाम झाला. देशातील हिंदूंचा अपमान करण्याचं पाप काँग्रेसने केलंय,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्धा येथे पार पडली. या प्रचारसभेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला एमीसॅट आणि २७ नॅनो उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. ‘वर्ध्यातून महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे. वर्ध्यातील लोकांचं प्रेम पाहता, माहित नाही या काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय होईल?”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही कुंभकर्णासारखी आहे. सत्तेत असताना घोटाळा करायचा आणि सहा-सहा महिने झोपून काढण्याचे काम त्यांनी केले, अशी टीका मोदींनी केली.

काँग्रेसला उद्देशून बोलताना मोदी म्हणाले की, तुमची शिवी माझ्यासाठी दागिना आहे. शौचालय काँग्रेससाठी मस्करीचा विषय असेल, मात्र माझ्यासाठी माझ्या माता-भगिणींसाठी इज्जतीचा विषय आहे, असंही यावेळी मोदी म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते कोणताही निर्णय विचार केल्याशिवाय घेत नाहीत असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. देशातील हवा कोणत्या दिशिने वाहते हे पवारांना चांगले माहित आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु असून अजित पवारांनी शरद पवारांची विकेट काढली आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असे टीकास्त्र त्यांनी पवार कुटुंबियावर सोडले.

आझाद मैदानात हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली गेली नाही, याचं कारण काँग्रेस-राष्ट्रवादीची व्होटबँक होय, असा आरोपदेखील मोदींनी यावेळी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.