नवी दिल्ली : संरक्षण दल प्रमुख म्हणून बिपीन रावत यांची निवड केल्याची माहिती दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिली. पंतप्रधानांनी लष्करप्रमुख म्हणून अखेरच्या दिवशी मेजवानी दिली. त्यावेळी मोदी यांनी नव्या जबाबदारीची माहिती रावत यांना दिली.
मोदी यांच्या या मेजवानीला मंत्रीमंडळातील वरीष्ठ सदस्य आणि तीनही लष्कर दलातील मुख्य अधिकारी उपस्थित होते. संरक्षण दल प्रमुख या पदाची निर्मिती करण्यात आली त्याच दिवशी मंत्रीमंडळाच्या संरक्षण समितीने या पदासाठी रावत यांच्या नावाला मान्यता दिली होती, अशी माहिती पुढे येत आहे.
सरकारला रावत यांना संरक्षण दलप्रमुख म्हणून 31 डिसेंबर रोजी नियुक्त करायचे होते. त्यामुळे तोपर्यंत त्यांची मुदतवाढ आणि अन्य अनुषंगिक कागदोपत्री जबाबदारी पूर्ण करण्यात आल्या, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
रावत यांचे कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये असेल. तर त्यांचे निवासस्थान लुटिझन्स झोन येथील तीन, कामराज मार्ग येथे प्रस्तावित करण्यात आले आहे. लष्करी कार्य विभागाची निर्मिती करून त्याचे प्रमुखपद रावत यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.