शिलॉंग – मेघालयातील तुरा येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला परवानगी मिळालेली नाही. भाजप ज्या ठिकाणी सभा घेण्याची परवानगी मागत आहे, त्या ठिकाणी काम सुरू असल्याचे सरकारने असे म्हटले आहे. तर दुसरीकडे सरकार भाजपला घाबरले आहे. त्यामुळे तुरा येथील रॅलीला परवानगी देत नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयात यावे, अशी मेघालयातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे निश्चितपणे पंतप्रधान मोदी येथे येऊन जनतेला संबोधितही करतील, असे भाजपने म्हटले आहे. येत्या 24 तारखेला तुरा येथे होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभेसाठी भाजपने पीए संगमा स्टेडियमसाठी अर्ज केला होता. हे स्टेडियम राज्य सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
भाजपचे सरचिटणीस ऋतुराज सिन्हा म्हणाले, खरे तर कॉनरॅड संगमा सरकार भाजपच्या लाटेला घाबरले आहे. पीए संगमा स्टेडियम अद्याप पूर्णपणे तयार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या त्यामध्ये काम सुरू आहे, तर वस्तुस्थिती अशी आहे की 16 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी या स्टेडियमचे भव्य उद्घाटन केले होते. स्टेडियम तयारच नव्हते तर उद्घाटन कसे झाले, असा सवाल त्यांनी केला.