नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली आणि स्कॉटलंडचा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यात मोदी जी-20 शिखर परिषद आणि हवामान बदलविषयक परिषदेत सहभागी होतील. तसेच, विविध देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करतील.
इटलीची राजधानी रोममध्ये 30 आणि 31 ऑक्टोबरला जी-20 गटाचे सदस्य असणाऱ्या देशांच्या प्रमुखांची शिखर परिषद होईल. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोदी गुरूवारी किंवा शुक्रवारी इटलीला रवाना होतील.
त्या परिषदेत करोना संकट, हवामान बदल, गरिबी निर्मूलन आदी जगाला भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा होईल. त्या आव्हानांवर मात करण्याच्या उद्देशातून भारताची असणारी भूमिका मोदी मांडतील. तालिबानी कब्जात असणाऱ्या अफगाणिस्तानमधील स्थिती हाताळण्यासाठी जागतिक समुदायाने एकजुटीतून प्रयत्न करण्याची गरज मोदींकडून अधोरेखित केली जाण्याची शक्यता आहे.
स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत कॉप-26 हवामान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्येही मोदी सहभागी होतील. हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी केल्या जाऊ शकणाऱ्या उपाययोजनांवर त्या परिषदेत चर्चा होईल. जागतिक समुदायातील नेत्यांची आणि तज्ञांची व्यापक परिषद म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.