Independence Day 2024 । PM Modi Speech : उद्या देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथेप्रमाणे दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार असून या भाषणात त्यांच्याकडून नेमकी काय घोषणा केली जाते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिल्लीच्या या विशेष सोहळ्यात सहा हजार नागरिकांची उपस्थिती असणार आहे.
गुरूवारी सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होणारे पंतप्रधानांचे भाषण ८ वाजेपर्यंत सुरू राहील व राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणात ते आपल्या सरकारची पुढची रूपरेषा स्पष्ट करतील. मुळात २०४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत.
तो पर्यंत भारत विकसित राष्ट्र झाले पाहिजे असे लक्ष्य सरकारकडून अगोदरच निर्धारित करण्यात आले आहे. सध्या विकसनशील राष्ट्र अशी ओळख असलेल्या भारताला विकसित राष्ट्रांच्या रांगेत उभे करण्याचा मनोदय सरकारने अगोदरच व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने उद्याच्या पंतप्रधानांच्या भाषणात काय जाहीर केले जाते याबाबतच उत्सुकता आणि चर्चाही सुरू आहे.
शिक्षण, आरोग्य आदी विषयांच्या संदर्भातील महत्वाच्या घोषणा मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणातूनच यापूर्वी केल्या आहेत. उद्या तरूणांच्या संदर्भात आणि ज्यांना देशाची निम्मे लोकसंख्या म्हटले जाते त्या महिलांच्या संदर्भात महत्वाची घोषणा केली जाण्याचा कयास वर्तवला जातो आहे.