कझान- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतली. जुलैमध्ये इराणच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोदींसोबतच्या पहिल्या भेटीत पेजेश्कियान यांनी पश्चिम आशियातील शांतता आणि तणाव कमी करण्यासाठी भारताच्या भूमिकेवर भर दिला कारण भारताचे सर्व देशांशी चांगले संबंध आहेत.
ब्रिक्स शिखर परिषदेच्या दरम्यान झालेल्या या बैठकीत चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यासोबतची बैठक चांगली होती आणि त्यांनी संबंधांचा आढावा घेतला. ही चर्चा उपयुक्त ठरल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावावर चिंता व्यक्त केली आणि भारताने नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली. मिस्त्री म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही चर्चा केली. पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले. इस्त्रायल, हमास आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष वाढत असताना दोन्ही नेत्यांमधील ही भेट झाली आहे.
वाढत्या तणावामुळे चिंतेत असलेल्या मोदींनी सप्टेंबरमध्ये युद्धबंदीचे आवाहन केले होते. दुसरीकडे, ब्रिक्स परिषदेपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही द्विपक्षीय बैठक घेतली. पुतीन यांनी मंगळवारीच ब्रिक्स परिषदेसाठी आमंत्रित नेत्यांसाठी डिनरचे आयोजनही केले होते.
कझान येथे पोहोचल्यानंतर भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. त्यांनी संस्कृत आणि हिंदीमध्ये गाणी गायली आणि वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या. पंतप्रधानांनी त्यांचे हात जोडून अभिवादन केले. पारंपरिक भारतीय वेशभूषा केलेल्या रशियन कलाकारांनी पंतप्रधानांसाठी रशियन नृत्य सादर केले तर काही इस्कॉन सदस्यांनी कृष्ण भजनही गायले.