पंतप्रधान मोदी आज पुण्यात; ‘त्या’ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची घाई

पुणे – महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी पुण्यात येणार असून, एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 4 वाजता ही सभा होणार आहे. मोदी काय बोलणार आणि कोणावर टीका करणार, याबाबतची उत्सुकता ताणली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होत आहे. त्यांचा ताफा विमानतळ रस्त्यावरून जाणार असल्याने त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.

पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी तसेच जिल्ह्यासाठी ही सभा आयोजित केली असून, शहर आणि जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार या सभेला उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनीही या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी केले आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडमधील विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील, अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहर आणि जिल्ह्यातील 21 उमेदवारही उपस्थित राहणार आहेत. या सभेला येताना नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याच्या बॉटल किंवा पिशव्या आणू नयेत, असे आवाहनही मिसाळ यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपने भक्कम शिरकाव केल्याचे चित्र दिसत असताना विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने आपले हुकमी नरेंद्र मोदी अस्त्र साताऱ्याच्या मैदानात आणले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या दि. 17 रोजी साताऱ्यात होणाऱ्या सभेकडे पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.