मुंबई : ‘ब्लू टीक’ आणि लसीकरणाचा टीका यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यायला हवा. ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाच्या टीक्याकडे केंद्र सरकार आणि भाजपने जास्त लक्ष द्यावे. असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे..
नवाब मलिक म्हणाले की, “ब्लू टीक’ आणि लसीकरणाचा टीका यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यायला हवा. ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाच्या टीक्याकडे केंद्र सरकार आणि भाजपने जास्त लक्ष द्यावे. ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्र सरकार ‘ब्लू टीक’ची लढाई लढताना दिसत होती तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाच्या टीक्याची लढाई लढत आहे. ट्विटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल. यावरून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल आहे. त्यांनी ब्ल्यू टीकच्या राजकारणातून बाहेर यावं आणि लसीकरणातील टीक्याकडे लक्ष द्यावं”
दरम्यान, भारताने सोशल मिडीयाबद्दलचे काही नियम तयार केले आहेत. हे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे भारत सरकारने सांगितले आहे. त्यामुळे ट्विटर आणि सरकारमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. तशातच, भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पदाधिकारी यांच्या नावापुढील व्हेरिफाईडची ब्लू टीक ट्विटरने काढून टाकली. या गोष्टीबद्दल भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने चूक सुधारली आहे.