मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. खुद्द राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉसल’ हा पुरस्कार दिला. या सन्मानानंतर मोदींनी तो भारतीयांना समर्पित केला. रशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी शिखर चर्चेत भाग घेतला. यादरम्यान पुतिन म्हणाले, युक्रेन संकटावर तुम्ही जो उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, एक मित्र या नात्याने शांततेचा मार्ग युद्धक्षेत्रातून जात नाही. बॉम्ब, बंदुका आणि गोळ्यांमध्ये शांतता शक्य नाही, असा सल्लाचे यावेळी म्हटले.
यासह, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा मुद्दा देखील उपस्थित केला. ते म्हणाले, आम्ही चाळीस वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत. हे भयंकर आणि घृणास्पद आहे. मॉस्कोवरील हल्ल्याची वेदना आम्हाला समजते. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. यापूर्वी मोदींनी महायुद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर ते रशियाच्या अँटम पॅव्हेलियनमध्ये पोहोचले. हे रशियन अणु तंत्रज्ञानाचे केंद्र म्हटले जाते.
झेलेन्स्कींनी व्यक्त केली नाराजी
दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदायमीर झेलेन्स्की यांनी मोदी-पुतिन भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेनमधील शांतता प्रयत्नांना मोदींचा हा मोठा धक्का असल्याचे त्यांनी वर्णन केले. त्यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर लिहिले की, ‘जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या नेत्याने जगातील सर्वांत रक्तरंजित नेत्याला आलिंगन देणे निराशाजनक आहे.’