पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा; “स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना सुरुवात
जयंतीनिमित्त एमजी रामचंद्रन यांना श्रद्धांजली
नवी दिल्ली – देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाला जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा कंदील दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देतील.
चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. बहुधा रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या गाडया सुरू करण्यात आल्या आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर यामुळे केवडीयाचे महत्त्व वाढले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
केवडिया जाण्यासाठी एक रेल्वेगाडी पुरुचि थालियावार डॉ. एमजी रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्थानकातून सुरू होत असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी भारतरत्न एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. चित्रपट पडद्यावर आणि राजकीय व्यासपीठावर त्यांनी केलेल्या कामगिरीची मोदींनी प्रशंसा केली.
“एमजीआर’ यांचा राजकीय प्रवास गरीबांना समर्पित आहे आणि त्यांनी वंचितांना प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांची आदर्श मूल्ये जपण्याचे कार्य आपण करत आहोत. “एमजीआर’ यांचे नाव चेन्नई मध्य रेल्वे स्थानकाला दिल्याची आठवणही पंताप्रधानांनी करून दिली.
पंतप्रधानांनी केवडिया आणि चेन्नई, वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्ली दरम्यान तसेच केवडिया व प्रतापनगर दरम्यान मेमू सेवेसह दाभोई-चांदोड ब्रॉडगेजिंग व चांदोड-केवडिया दरम्यान नवीन मार्गाकडे लक्ष वेधले. याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक आदिवासी दोघांनाही होईल. हा रेल्वेमार्ग नर्मदावरील कर्नाली, पोईचा आणि गरुडेश्वर यासारख्या श्रद्धास्थानांना जोडेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
केवडिया हा काही आता दुर्गम भागातील छोटासा भाग राहिला नाही, तो जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयाला आला आहे. “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा अधिक पर्यटक आकर्षित करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाला समर्पित झाल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी 50 लाखाहून अधिक पर्यटक येऊन गेले आहेत. आता केवडियामध्ये दररोज सुमारे एक लाख पर्यटक भेट देतील, असा अंदाज पंतप्रधानांनी व्यक्त केला.
ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर समर्पित केला गेला आहे. या प्रकल्पाचे काम 2006-2014 दरम्यान केवळ कागदावरच झाले. आता येत्या काही दिवसांत एकूण 1100 किलोमीटरचे काम पूर्ण होणार आहे. ब्रॉडगेजिंग आणि विद्युतीकरणाच्या कामाना वेग आला आहे आणि उच्च वेगासाठी रेल्वेमार्ग तयार केले जात आहेत. आता सेमी हायस्पीड गाड्या धावण्यासाठी सक्षम झाली असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
रेल्वेमध्ये आत्मनिर्भरतेला महत्व…
रेल्वेशी संबंधित उत्पादन आणि तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेचे महत्त्व यावरही त्यांनी भर दिला. आज स्वदेशी निर्मित आधुनिक गाड्या भारतीय रेल्वेचा एक भाग असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रेल्वे परिवर्तनाची गरज भागवण्यासाठी कुशल तज्ञ मनुष्यबळ आणि व्यावसायिकांची गरज आहे. यासाठी वडोदरामध्ये अभिमत रेल्वे विद्यापीठाची स्थापना झाली.
या दर्जाची संस्था असणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. 20 राज्यांमधील प्रतिभावान तरुणांना रेल्वेच्या वर्तमान आणि भावी विकासासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे नावीन्यपूर्ण संशोधनातून रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यात मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा