PM Modi : गाझा पट्टीवर सत्ता गाजवणारे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ऑक्टोबरपासून सुरू असून, हे युद्ध काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. याच युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून इस्रायल-हमास युद्धामुळे गाझा पट्टीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूविषयीतीव्र निषेध व्यक्त केला आहे. या युद्धामुळे पश्चिम आशियातील वाढत्या आव्हानांना तोंड देताना ग्लोबल साउथमध्ये एकता आणि सहकार्याची नितांत गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
भारतामार्फत आयोजित दुसऱ्या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट’ला पंतप्रधानांनी संबोधित केले. यादरम्यान त्यांनी हिंसा आणि दहशतवादाविरोधात भारताच्या ठाम भूमिकेवर भर दिला. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच निषेध केला आहे. ‘ग्लोबल साउथ’ हे प्रामुख्याने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत वसलेले, विकसनशील किंवा कमी विकसित म्हणून ओळखल्या जाणार्या देशांचे प्रतिनिधित्व करते.
इस्रायल- हमास युद्धाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींमुळे नवीन आव्हाने उभी होताना दिसत आहेत. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘आम्ही नेहमीच संयम बाळगण्याबाबत बोललो आहोत. आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात नागरिकांच्या मृत्यूचाही आम्ही तीव्र निषेध करतो.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवली आहे. आता वेळ आली आहे की ग्लोबल साउथच्या देशांनी जागतिक हितासाठी व्यापकपणे एकत्र आले पाहिजे.” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, गाझा पट्टीवर राज्य करणाऱ्या हमास या अतिरेकी गटाने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 लोक मरण पावले, त्यापैकी बहुतांश इस्रायली नागरिक होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बफेक केली. यामुळे गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 11 हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे युद्ध थांबवण्यासाठी जगभर निदर्शने होत आहेत.