नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर संपर्क साधून ईशान्य युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली आहे.
तेथील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 700 भारतीय विद्यार्थी सुमीमध्ये अडकले आहेत. सुमारे 35 मिनिटे चाललेल्या फोन संभाषणात पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
युक्रेन मध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर मोदींनी झलेन्स्की यांच्याशी दुसऱ्यांदा हा संपर्क साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये रशियाच्या भूमिकेबाबतही चर्चा झाली. रशिया आणि युक्रेन यांच्यात थेट राजकीय संवाद प्रस्थापित झाल्याबद्दलही मोदींनी त्यांचे कौतुक केले.