भाजपच्या नव्या टीमला पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा; म्हणाले…

नवी दिल्ली – अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याच्या तब्बल आठ महिन्यानंतर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. नड्डा नियुक्त कार्यकारणीमध्ये युवक व महिला नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहतात, “नवनिर्वाचित टीमला शुभेच्छा. मला पूर्ण विश्वास आहे की सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाची निस्वार्थी व उस्फुर्तपणे भारतीय जनतेची सेवा करण्याची परंपरा अबाधित राखतील. सर्वांकडून गरीब व उपेक्षित घटकांची सेवा घडो हीच अपेक्षा.”


महाराष्ट्राला मोठी जबाबदारी 

नड्डा नियुक्त टीममध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण १३ राष्ट्रीय सचिवांच्या या टीममध्ये पंकजा मुडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंडे, तावडे यांना संधी 

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने विनोद तावडे यांना उमेदवारी दिली नव्हती. तावडेंना उमेदवारी न दिल्याने अनेक चर्चाही रंगल्या होत्या. तर पंकजा मुंडे यांना आपल्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या पातळीमध्ये बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पराभवानंतर मुंडे यांना विधानसभा अथवा राज्यसभेवर संधी देण्यात आली नव्हती. यामुळे मुंडे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. मात्र नव्या कार्यकारणीत मुंडे व तावडे या दोन्ही बड्या नेत्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

खडसेंच्या पदरी निराशाच  

पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे बऱ्याच कालावधीपासून पक्षावर नाराज आहेत. मात्र नव्या टीममध्ये संधी देऊन खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला नसल्याने त्यांच्या पदरी याही वेळेस नाराजीचा पडली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.