Mann Ki Baat : शहीद जवानांच्या सन्मानार्थ ‘मेरी माती, मेरा देश’ उपक्रम – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली :- आमच्या शहीद शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी “मेरी माती मेरा देश’ नावाची एक मोठी मोहीम देशात सुरू केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मन की बातच्या 103 व्या आवृत्तीत पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित करताना ही माहिती दिली.
ते म्हणाले की, दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ एक अमृत वाटिका देखील बांधली जाईल आणि त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7,500 कलशांमधून माती आणि झाडांची रोपे दिल्लीत आणली जातील. याअंतर्गत आपल्या अमर जवानांच्या स्मरणार्थ देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. ज्यात “अमृत कलश यात्रा’ समाविष्ट आहे. त्याद्वारे हे कलश दिल्लीत आणले जाणार आहेत. ही अमृत वाटिका “एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक बनेल.
ते म्हणाले की, “मेरी माती, मेरा देश’अंतर्गत देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेखही लावण्यात येणार आहेत.
याशिवाय “हर घर तिरंगा’ मोहिमेत यंदाही सहभागी होऊन ही परंपरा अखंडपणे पुढे नेण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी देशवासीयांना केले.
यावेळी पंतप्रधानांनी जलसंवर्धनासाठी केंद्राचे प्रयत्न आणि वचनबद्धता अधोरेखित केली.
ते म्हणाले की, आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना देशभरात 60,000 हून अधिक अमृत सरोवर बांधण्यात आले असून, आणखी 50,000 अमृत सरोवर बांधण्याचे काम सुरू आहे. देशात वृक्ष संवर्धनाचेही मोठे काम सुरू असून, उत्तर प्रदेशात एका दिवसात 30 कोटी झाडे लावण्याचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.
हा उपक्रम लोकसहभागाचे तसेच जनजागृतीचे उत्तम उदाहरण आहे. झाडे लावण्यासाठी आणि पाणी वाचवण्यासाठी अशा प्रयत्नांमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.





