मोदी आणि भाजपने देशातील महिलांची माफी मागावी,
नवी दिल्ली – भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल “अभद्र भाषा” वापरल्याबद्दल कॉंग्रेसने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे आणि असे न झाल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
भाजप प्रमुख नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात, कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, 23 जुलै रोजी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शुक्ला यांनी सोनिया गांधींबद्दल वारंवार असंसदीय आणि असभ्य भाषा वापरली आहे.
रमेश म्हणाले की, भाजपचे सर्वोच्च नेते आणि प्रवक्ते, जे संस्कृतीबद्दल बोलतात, त्यांनी देशातील आदरणीय महिला, विशेषत: एका राष्ट्रीय पक्षाच्या 75 वर्षीय अध्यक्षांविरुद्ध वारंवार आक्षेपार्ह भाषा वापरणे ही संतापजनक बाब आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी अपशब्द वापरणे हे भाजपची महिला विरोधी विचारसरणी दर्शवते. अशा आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकारणाची पातळी खालावली आहे, असे ते म्हणाले.
वैदिक काळापासून महिलांचा आदर ही भारताची मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे राजकारणात शालीनता आणि महिलांबद्दल आदरयुक्त वागणूक ही सत्ताधारी भाजपकडून स्वाभाविकपणे अपेक्षित आहे, परंतु पक्षाने आपल्या भाषेने आणि वागण्याने आपली वारंवार निराशा केली आहे, असे रमेश यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.