नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत करोनाची दुसरी लाट भारतासाठी घातक ठरली आहे. देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांचा जीव जात आहे. देशातील या स्थितीवरून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातच आता देशातील सर्वात मोठी संस्था असलेल्या इंडियन मेडीकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी देशातील सध्याच्या स्थितीवर संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करोनाचे ‘सुपरस्प्रेडर’ असून त्यांच्यामुळेच देशात करोनाची दुसरी लाट आली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
देशात करोनाची दुसरी लाट आलेली असताना मोठ-मोठ्या राजकीय सभा घेणं आणि कुंभमेळा सारख्या कार्यक्रमांना परवानगी दिल्याने करोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचं डॉ. दहिया यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त ‘दी ट्रेब्यु’ने दिलं आहे. ज्या व्यक्तीच्या माध्यमातून अनेकांना करोनाची लागण होते, अशा व्यक्तीला करोना सुपरस्प्रेडर म्हणतात.
देशातील आरोग्य कर्मचारी करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि नियम पाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत होते. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांत मोठ-मोठ्या प्रचार सभांना संबोधित करत होते. या सभांमध्ये सर्रास करोनाचे नियम मोडल्याचे, डॉ. दाहिया यांनी म्हटलं. तसेच करोनाची दुसरी लाट अद्याप सर्वोच्च पातळीवर नाही, मात्र आपली आरोग्य सेवा पूर्णपणे डळमळीत झाली आहे. पंतप्रधान मोदींनी मागील वर्षभरात आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात निर्णय घेतल्याचं दिसून आलं नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
याआधी पंतप्रधान मोदींवर परदेशी वृत्तपत्रांनी देखील मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. पहिल्या लाटेच्या वेळी देखील मोदी गंभीर नव्हते. त्यांनी त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित मोठा कार्यक्रम घेतला होता, याची आठवणही डॉ.दहिया यांनी करून दिली.