पंतप्रधानांच्या हस्ते ‘एम-योगा’ ऍपचा प्रारंभ; जाणून घ्या अॅपची वैशिष्ट्ये

नवी दिल्ली – सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “डब्लूएचओ एम-योगा’ या मोबाईल ऍपचा शुभारंभ केला. या ऍपवर, योगप्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील.

हे ऍप म्हणजे, प्राचीन विद्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुंदर मिलाफाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. एम-योगा ऍपमुळे जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल, तसेच “एक जग, एक आरोग्य’ साधण्याच्या प्रयत्नांतही हे ऍप महत्वाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे मोबाईल ऍप योगाच्या प्रसारासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकेल. विशेषतः सध्याच्या करोना महामारीच्या काळात त्याचा उपयोग होईल. कोविड रूग्णांची प्रकृती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

योगाचा जगभरात प्रसार करण्याच्या उद्देशाने, जुलै 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयादरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला होता. एम-योगा प्रकल्पात चार गोष्टींवर भर देण्यात आला आहे.

सर्वांच्या निरामय आयुष्यासाठी सामान्य योगनियम, मानसिक आरोग्य आणि काटक शरीरासाठी योगाभ्यास, कुमारवयीन मुलांसाठी योगाभ्यास आणि मधुमेहाचा धोका असणारयांसाठी योगाभ्यास या चार मुद्यांवर आधारित आवश्‍यक माहिती असलेली एक छोटी पुस्तिका आणि मोबाईल ऍप्लीकेशन मोरारजी देसाई राष्ट्रीय योगसंस्थेने, जागतिक आरोग्य संस्थेच्या तंत्रज्ञान सल्लागारांच्या सल्ल्‌याने विकसित केले आहे.

दैनंदिन योगाभ्यासासाठी 45 मिनिटे, 20 मिनिटे आणि दहा मिनीटांच्या कालावधीचे योगाभ्यास सत्र तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय, योगविषयक नियमांची पुस्तिका, व्हिडीओ, त्यांचे सहा भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम या संस्थेने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.