पुणे – राज्यात सध्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा देखील अपुऱ्या पडत असून रुग्णांना बेड मिळणं कठीण झालं आहे. तर लसीकरण मोहीम देखील अपुऱ्या पुरवठ्यामुळं मंदावली आहे. यावरून राजकारण तापलं असून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातच पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटरही खराब निघाल्याचे समोर आलं आहे.
पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. ससून रुग्णालयाचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत या व्हेंटिलेटरविषयी तक्रार केली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून असल्याचं डॉ. मुरलीधर तांबे म्हटलं आहे.
आधीच लसीवरून आरोपप्रत्यारोप सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी आकडेवारीसह हा दावा केला होता. त्यात आता केंद्र सरकारने दिलेले व्हेटिलेटरच खराब आल्याचं समोर आलं आहे.