काबूल – अफगाणिस्तान आणि अमेरिकेच्या सैन्यावर आत्मघातकी हल्ले केलेल्या हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना भूखंडाच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याच्या सर्व प्रयत्नांच्या विरोधात तालिबानचे हे चिथावणीखोर कृत्य आहे.
तालिबानचा हंगामी गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी याने काबूलमधील एका हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात डझनभर हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना हे बक्षिस दिले जाईल, असे आश्वासन दिले. गृह मंत्रालयाचा प्रवक्ता सईद खोस्ती याने मंगळवारी ट्विटरवरून ही माहिती दिली.
कार्यक्रमात हक्कानी याने मरण पावलेल्या हल्लेखोरांचे कौतुक केले. या सर्व हल्लेखोरांचा उल्लेख त्याने “हुतात्मा’, ‘इस्लाम आणि देशाचे नायक’ असा केला. या कार्यक्रमाच्या शेवटी हक्कानी याने प्रत्येक कुटुंबाला 10 हजार अफगाणी (112 डॉलर) च्या पुरस्काराचे वाटप केले आणि भूखंड देण्याचे आश्वासनही दिले. सर्व कुटुंबांना आलिंगन देतानाचे हक्कानीचे फोटो खोस्ती याने ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
युरोपातील देशांकडून अजून तालिबानी राजवटीला मान्यता दिली गेलेली नाही. ही मान्यता मिळवण्यासाठी उच्चस्तरिय चर्चेची प्रक्रिया सुरू करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे. त्याचवेळी तालिबानने आत्मघातकी हल्लेखोरांचे कौतुक केले आहे.