पिंपरी, दि. 16 – नवी सांगवीतील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याला प्रशासनाला मुहूर्त मिळेना झाला आहे. शासनाकडून ड संवर्गातील भरावयाची 490 पदे मंजूर आहेत. मात्र अनेक वर्षांपासून 126 पदे रिक्त आहेत. तर त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाकडून सुविधा मिळण्यात अडचण येत आहे. रुग्णांची हेळसांड होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे रिक्त पदांबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून परीक्षेद्वारे लवकरच भरती होईल, त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आवश्यक मनुष्यबळच नसल्याचे चित्र आहे. जिल्हा रुग्णालयात सरळसेवेने भरावयाची 464 पदे मंजूर आहेत. त्या पैकी 356 पदे भरण्यात आली असून 108 पदे रिक्त आहेत. पदोन्नतीने भरावयाची 26 पदे मंजूर आहेत. त्या पैकी 2 पदे भरण्यात आली असून 24 पदे रिक्त आहेत.
शिपाई, मदतनीस नसल्याने रुग्णांना एका वॉर्डमधून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी कर्मचारीच भेटत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. क्ष किरण परिचर नसल्याने एक्सरे काढण्यासाठी रुग्णांना तासनतास थांबावे लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरून रुग्णांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे कंसात आकडेवारीसह –
मदतनीस (1), शिपाई (6), सफाईगार (16), कक्ष सेवक (50), बाह्य रुग्णसेवक (3), अपघात विभाग सेवक (2), क्ष किरण परिचर (3), दंत सहायक (25), संदेशवाहक (2) आदींचा समावेश आहे.
पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे कंसात आकडेवारीसह –
शस्त्रक्रियागार (6), व्रणोपचार (14), मुकादम (2), दप्तरी (2) आदींचा समावेश आहे.