“लोकांचे जीव वाचण्यासाठी कृपया पूर्ण लॉकडाऊन करा”; ‘या’ शहराच्या महापौरांचे पालकमंत्र्यांना पत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्यात संचारबंदीचे नियम लागू झाले. कोरोना विषाणूचे संकट तीव्र होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय़ घेतला. नागरिकांकडून वारंवार कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे होणारे उल्लंघन पाहता, सरकारने आता थेट कडक लॉकडाऊनचा इशाराही दिला आहे. किंबहुना नाशिकच्या महापौरांनी यासंदर्भातील मागणी करणारे एक पत्र पालकमंत्री छगन भुजबळ यांना लिहिले आहे.

नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या पत्रातून नाशिकमधील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं म्हणत या ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ घेतला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, त्या तुलनेत आरोग्य विभागातील कर्मचारी आणि बेडची संख्याही कमी पडू लागली आहे. शिवाय आरोग्य यंत्रणेवर त्यामुळे ताणही येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी या पत्रातून मांडली आहे.

नाशिकमध्ये रॅपिड अँटीजन आणि आरटीपीसीआर चाचणीसाठीही नागरिकांच्या रांगा वाढतच चालल्या आहेत. त्यामुळं एकंदर परिस्थिती पाहता त्यांनी लॉकडाऊनची मागणी केली आहे. ल़ॉकडाऊनमुळं आर्थिक व्यवहार थांबतील, पण नाशिककरांचा जीव मात्र वाचेल अशा शब्दांत त्यांनी सक्तीच्या आणि पूर्ण लॉकडाऊनची गरज असल्याची मागणी छगन भुजबळ यांच्याकडे केली.

शहरातील स्मशानभूमी अहोरात्र धगधगत असून, रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठीही वाट पाहावी लागत आहे, ही मन हेलावणारी वस्तुस्थिती त्यांनी आपल्या पत्रातून मांडली. कुलकर्णी यांनी मांडलेले हे चित्र पाहता नाशिकमध्ये आता नेमका पूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात छगन भुजबळ काय निर्णय़ घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.