फिटनेस प्रमाणपत्र न घेताच 556 बस करताहेत विद्यार्थ्यांची वाहतूक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात विविध शाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दररोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी बहुतांश वाहने सुरक्षितच नसल्याची बाब उघड झाली आहे. शहरामध्ये हजारो विद्यार्थ्यांना घेऊन धावणाऱ्या 556 स्कूल बसच्या मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतले नसल्याने या बस वाहतूक करण्यासाठी योग्य आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्कूल बसची चाचणी करणे बंधनकारक असतानाही कोणतीही चाचणी न करता गेल्या दीड महिन्यापासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरू ठेवली आहे. मात्र, या प्रकरणी कुठलीच दंडात्मक कारवाईही होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त आहे. फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी वाहनांना परिवहन विभागाने निश्चित करुन दिलेले निकष तंतोतंत पाळावे लागतात. या निकषांबाबत सरकारकडून कडक धोरण आमलात आले आहे. या निकषांची पूर्तता करत नसलेल्या बस मालकांकडून फिटनेस चाचणी दिली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत व शाळेतून घरी सोडण्यासाठी बहुतांश शाळेने स्कूल बसची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांमार्फत विद्यार्थ्यांना ने-आण करण्यात येत असते. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी शासनाने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून स्कूलबससाठी काही नियमावली तयारी केली आहे. त्यानुसार, या स्कूलबसमध्ये अग्निशामक यंत्रणा, लांबी, उंची, रुंदी तसेच इतरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरेच निकष निश्चित करण्यात आले आहेत. हे निकष पूर्ण केल्यानंतरच फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त होते.
यासाठी आरटीओमध्ये फिटनेस चाचणीही घेतली जाते. फिटनेस प्रमाणपत्र घेतल्याशिवास बस विद्यार्थ्यांची वाहतूक करु शकत नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागातील शाळा तसेच खाजगी वाहतूकदारांनी या नियमाला फाटा दिल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मावळ, जुन्नर, आंबेगाव व पिंपरी-चिंचवड शहर या भागाचा समावेश आहे. या सर्व भागांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी 2 हजार 185 स्कूल बस असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आहे. यापैकी 1629 स्कूल बसच्या मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतले आहे. तर तब्बल 556 स्कूल बस विना फिटनेस प्रमाणपत्रच धावत आहेत.
परवाने रद्द करणार
ज्या स्कूल बसच्या मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतले नाही. त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या स्कूल बस चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
अवैध रिक्षांवर कारवाई नाहीच
अनेक ठिकाणी रिक्षा, सिक्स सीटरमधून अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. एका रिक्षामध्ये सात ते दहा विद्यार्थी कोंबून शाळेपर्यंतचा प्रवास केला जातो. हे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळते. एखादा अपघात झाल्यास क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी रिक्षामध्ये असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे असतानाही याकडे पालकांसह वाहतूक पोलीस व आरटीओने दुर्लक्ष केले आहे.
योग्यता चाचणीसाठी स्कूल बस चालकांना वेळोवेळी नोटीस देण्यात आली आहे. अनेक माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांचे परवाने रद्द करून दंडही आकारला जाणार आहे.
– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.