नवी दिल्ली : दिल्लीत एका आयएएस अधिकाऱ्याला आपल्या पाळीव कुत्र्यावर प्रेम व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये खेळाडूंचा सराव थांबवून पाळीव कुत्र्यासोबत फिरल्यामुळे वादात सापडलेले आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची दिल्लीहून लडाखमध्ये बदलीकरण्यात आली आहे. एवढंच नाही तर मंत्रालयाने त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची बदली करून त्यांना अरुणाचल प्रदेशात पाठवले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता आणि अहवाल आल्यानंतर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली शहरातील त्यागराज स्टेडियम राज्य सरकारच्या मालकीचे आहे. या स्टेडियमची देखभाल सरकारकडून केली जाते. २०१० कॉमनवेल्थ गेम्ससाठी हे मैदान तयार करण्यात आले होते. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथे खेळाडू सरावासाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र या स्टेडियमवर सायंकाळी सात वाजल्यानंतर दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिन संजीव खिरवार आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला येतात. त्यामुळे या खेळाडूंना वेळेच्या आधीच म्हणजेच संध्याकाळी सात वाजता खेळ आणि सराव बंद करुन मैदान सोडण्यास भाग पाडण्यात येत आहे.
एका आएएस अधिकाऱ्याला कुत्र्यासोबत फिरायला यायचे असल्यामुळे सर्वच खेळाडूंना मैदान खाली करायला सांगितले जात आहे. या प्रकारामुळे रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या ताब्यातील सर्व मैदाने आणि खेळांसंदर्भातील सुविधा रोज रात्री दहा वाजेपर्यंत खेळाडूंसाठी उपलब्ध असतील अशी खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले आहेत.