#IPL2020 : बायोबबलचे उल्लंघन केल्यास कोटींचा दंड

दुबई – करोनाचा(कोव्हिड-19) धोका जगभरात अद्याप कायम असल्याने अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी खास बायोबबल सुरक्षा तयार करण्यात आली आहे. स्पर्धेतील सहभागी संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच संघांशी संबंधित कोणाकडूनही त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित संघाला 1 कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे. 

याबाबत बीसीसीआयने समितीसह सर्व संघांना त्याची सूचना दिलेली आहे. जर एखादा खेळाडू या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर गेला व त्याला परत यायचे असेल तर त्याला सहा दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे. पहिल्यांदा चूक घडली तर हा कालावधी असेल व पुन्हा अशी चूक केली तर त्याला संघातून बाहेर काढले जाइल तसेच त्याच्या जागी बदली खेळाडू देखील निवडण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

बायोबबल मधून बाहेर जाताना परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले तर त्या खेळाडूच्या संघाला 1 कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे तसेच त्या संघाचे गुणही कमी केले जातील, असे समितीने स्पष्ट केले आहे.

बायो-बबल सुरक्षा म्हणजे काय?

यंदाच्या आयपीएल 2020 स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोव्हिड-19 संसर्ग होऊ नये म्हणून बायो-बबलची व्यवस्था करण्यात आली आहे. बायो-बबलसाठी कडक नियमावली सक्तीने लागू करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना बायो-बबल म्हणजेच जैव सुरक्षित वातावरणामध्ये राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी संपर्क राहणार नाही. खेळाडूंचे जग हे हॉटेल, सरावाचे मैदान आणि आयपीएल लढती एवढ्यापुरतेच मर्यादित राहणार आहे. तसेच आयपीएलचे सामनेही रिकाम्या स्टेडियममध्ये होत आहेत. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.