प्लॅस्टिक बंदी : अधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी

पुणे -मार्केटयार्ड येथील फूल बाजाराची मंगळवारी (दि. 17) राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रादेशिक अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. फुलावर प्लॅस्टिक आहे का, हे यावेळी पाहिले. त्यामुळे व्यापारी धास्तावले आहेत.

दरम्यान, फूल बाजार संघटनांनी जनजागृतीसाठी 2 दिवसांची मुदत मागितली आहे. दरम्यान, धान्याच्या दुकानांमध्ये पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्यास परवानगी दिली जाते. तशीच परवानगी फूल बाजारातही देण्यात यावी, अशी मागणी अखिल फूल बाजार आडते असोसिएशनचे प्रसिद्धीप्रमुख सागर भोसले यांनी केली आहे. याबाबत बाजार समितीने शासनाकडे फुलांसाठी प्लॅस्टिक वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी करावी, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्‍त केले.

परराज्यातून येणाऱ्या फुलांना प्लॅस्टिकचे आवरण असते. ज्यावेळी ही फूले महाराष्ट्रात येतात. त्यावेळीच बंदी घालावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. जर्बेरा, आर्केड, लिलियम, शेवंती, अँथोरियम कागडा आदी फुलांना प्लॅस्टिकचे आवरण असते, हे आवरण काढायला यावेळी लावण्यात आले. अखिल फूल बाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर म्हणाले, याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी शासनाने प्लॅस्टिकची अट शिथिल करावी, अशी मागणी पर्यावरण मंत्र्यांकडे करणार आहे.

प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृती व्हावी, या मताशी आम्हीही सहमत आहे. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांनी शेतकरी, व्यापाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणे अपेक्षित आहे.
– हरिभाऊ कामठे, उपाध्यक्ष, फूल बाजार आडते व व्यापारी संघटना

Leave A Reply

Your email address will not be published.