राजगुरूनगर – गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वानाच आतुरता वाटत आहे. बाप्पांच्या समोर आरास करण्यासाठी आणि बाप्पाच्या विविध रूप आणि रंगातील मूर्ती खरेदीसाठी राजगुरुनगर बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारात असून त्यांना जास्त मागणी आहे तर शाडूच्या मूर्ती बाजारात अत्यंत कमी प्रमाणात आहेत.
लाडके गणराय सोमवारी (दि. 2) घरोघरी व सार्वजिक मंडळात विराजमान होणार असल्याने व आज (रविवार) सुट्टीचा दिवस असल्याने तालुक्यातील बाजारपेठा गजबजल्या होत्या. एकीकडे पावसाचे अस्मानी संकट आणि दुसरीकडे आर्थिक मंदी या कचाट्यात अनेक कुटुंबे सापडली आहेत. मात्र, तरीही गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे पर्यावरण पूरक शाडूचा गणपती घरात बसविण्याचा अनेक संस्था प्रामाणिक प्रयत्न करतात मात्र त्यांच्या या आवाहनाला गणेश भक्त साथ देत नाहीत. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींना जास्त मागणी आहे. तालुक्यात सर्वत्र याच गणपतीचे स्टॉल असून शाडूच्या गणपतीचे स्टॉल नसल्याने अनेक गणेश भक्तांना इच्छा असूनही या मूर्ती विकत घेत येत नाहीत. अनेक गणेश मंडळे पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करीत असल्या तरी मूर्ती मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसचीच घेत आहेत. विसर्जन केल्यानंतर या मूर्ती तशाच राहत असल्याने त्यांचे विद्रुपीकरण होते. ते टाळण्यासाठी काही संस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत मूर्तीदान हा उपक्रमन अनेक संस्था संघटना गेली काही वर्षापासून तालुक्यात राबवत आहेत.
तालुक्यात पाच हजार मंडळे
खेड तालुक्यात दरवर्षी पाच हजारांच्या आसपास गणपती मंडळे आणि 40 हजारांच्या वर कुटुंबे गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतात. तर हजारो कुटुंबे गौरी गणपती बसवतात.
मंदी आणि पूराचा फटका
गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना खर्चाला फाटा दिला असल्याचे अनेक गणपती बनविणाऱ्या व विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारात मंदीचे सावट आहे पावसाचे अस्मानी संकट उभे असल्याने बचती शिवाय पर्याय नसल्याचे अनेक गणेशभक्तांनी सांगितले. वाढती महागाई, मंदीचे सावट आणि असमानी संकटाचा भक्त व गणेश मंडळांना जाणवले आहे. उत्सव काळात होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल मंदावली आहे. असे असले तरी गणपती उत्सव बचतीत का होईना गणेश भक्त साजरा करण्यास सज्ज झाला आहे.