देहूरोड (वार्ताहर) – देहूरोड हद्दीतील शेलारवाडी गावातील तरुणाने करोनाबाधित रुग्णाला आवश्यक असणारा प्लाझ्मा दान करून वेगळा आदर्श निर्माण केल्याने परिसरामध्ये त्याचे कौतुक केले जात आहे.
शेलारवाडी गावात गेल्या महिन्यात नंदकुमार बाळासाहेब शेलार हा पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्याने करोनावर यशस्वी मात करून करोनाला हरवले. गुरुवारी (दि. 30) सोशल मीडियावर प्लाझ्मा पाहिजे (रक्तातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्लाझ्मा) असा एक व्हायरल झालेला मॅसेज शेलार याला आल्यावर त्याने संबधित व्यक्तीला संपर्क साधला असता एकाच कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, दोन मुले असा 5 जणांचा परिवार करोना पॉझिटिव्ह असल्याची माहीती मिळाली. त्यातील संबधित व्यक्तीचे आई-वडील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. त्यांच्यासाठी तातडीने प्लाझ्माची आवश्यकता होती.
“प्लाझ्मा’मुळे मिळते जीवनदान…
करोनावर शाश्वत उपचार नसल्याने करोनामुक्त रूग्णांच्या शरीरातील ऍन्टिबॉडीज (प्रतिपिंड) अन्य बाधित रूग्णांना जीवनदान देण्याकामी उपयोगी ठरत आहे. एका करोनामुक्त रूग्णाच्या प्लाझ्मा दानातून 4-5 करोना पॉझिटिव्ह व्यक्तींना ऍन्टिबॉडीज् तयार करण्यासाठी मोठी मदत होते. म्हणून प्लाझ्मा ही पद्धत सर्वात फायदेशीर ठरत आहे. अन्य कोणत्याही आजार नसलेला सुदृढ करोनामुक्त रूग्ण बरा झाल्यानंतर 28 दिवसांपासून प्लाझ्मा दान करू शकतो, अशी माहिती वैद्यकीय जाणकारांकडून मिळाली आहे.