हुर्रे! पुण्यातील प्लाझ्मा थेरपी यशस्वी

ससून रुग्णालयाला यश; करोनाबाधित ठणठणीत बरा

पुणे – ससून रुग्णालयाने करोनाबाधितावरील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी करीत एका रुग्णाचे प्राण वाचविले. या यशानंतर आता दुसऱ्या बाधितांवरही प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात येणार असल्याचे ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी सांगितले. पुण्यातील “प्लाझ्मा थेरपी’ यशस्वी
पुणे शहरात करोनाबाधितांची संख्या 150 ते 200ने वाढत आहे. तर मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे, अशा परिस्थितीत ससून रुग्णालयाने “प्लाझ्मा थेरपी’तून रुग्णांना आशेचा किरण दाखविला आहे. यासाठीच्या आवश्‍यक सर्व परवानग्यानंतर दात्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे.

नायडू रुग्णालयातून ठणठणीत बरे झालेल्या (दि. 6 मे) व्यक्तीने प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर सर्व तपासणी करून ससून रुग्णालयातील एका करोनाबाधित रुग्णाला सलग दोन दिवस (दि. 10 आणि 11 मे) आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रतिदिन 200 एमएल प्लाझ्मा देण्यात आला.

या व्यक्तीला उच्च रक्तदाब, हायपोथायरॉईडीझम व अतिस्थूलपणा आजार होते, अशा रुग्णाला बरे करणे हे डॉक्‍टरांसमोर आव्हान असते, डॉक्‍टरांनी ते यशस्विरीत्या पेलले. प्लाझ्मा थेरपी झाल्यानंतर 15 दिवसांनी संबंधित व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अतिदक्षता विभागातून त्यांना इतर वॉर्डमध्ये हलविण्यात आले असून लवकरच त्यांनी घरी सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हिमतीमुळे एकाला जीवनदान
करोनामधून बरे झालेल्या व्यक्‍तीच्या रक्‍तातून प्लाझ्मा काढून, बाधित व्यक्‍तीला देता येतो. कारण, त्या व्यक्‍तीमध्ये अँटीबॉडी निर्माण होण्याची क्षमता अधिक असते. त्यासाठी सुरुवातीला बरे झालेल्या 22 जणांची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये एका व्यक्‍तीने रक्‍तदान करून त्यातून प्लाझ्मा काढून ससूनमधील बाधित व्यक्‍तीला दिल्यामुळे त्याला जीवनदान मिळाले.

करोना आजारातून बरा झालेला रूग्ण प्लाझ्मा दान करू शकतो. वय वर्षे 18 वर्षापेक्षा जास्त असलेला पुरुष किंवा मूलबाळ नसलेली महिला प्लाझ्माचे दान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत करू शकते.
– मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.