वनस्पती: आंबा

मधुर आणि रसाळ असतो म्हणून तर आंबा हा फळांचा राजा. भर उन्हाळ्यात दिलासा देणारे फळ. आंब्याच्या वृक्षाला भारतीय वृक्षांमध्ये सर्वोत्तम मानण्यात येते. त्याचे फळ मधुर व आरोग्यवर्धक आहे. आंब्याची सावलीही घनदाट असते. आंब्याच्या मोसमाला सुरुवात झाल्यावर लांब मोहराला मळकट, पिवळ्या रंगाची लहान फुले येतात. मोहरलेल्या आंब्यांचे सौंदर्य पाहण्यासारखं असतं. या मोहराला विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो. त्याचा उपयोग अत्तर करण्यासाठीही करतात.
आरोग्यासाठी आंबा उत्तम आहे. शिवाय अनेक व्याधीतून मुक्‍त करणारा, मनाला तृप्ती देणारा आंबा शक्‍तिदायक व कामोत्तेजकही आहे. आयुर्वेदातील “भावप्रकाश’ ग्रंथांत आंब्याच्या मोहराला अतिसार आणि त्रिदोषनाशक तसंच रक्‍तशोषक म्हटले आहे.

आंब्याच्या फळात भरपूर पोषक प्रथिने असतात. पिकलेल्या आंब्यात प्रथिने, तंतू, खनिज पदार्थ, कार्बो-हायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, विटॅमिन ए,बी, सी मुबलक प्र्रमाणात असते. भारतीय आंब्यात विटॅमिन सी चे प्रमाण इतर फळांच्या तुलनेत अधिक आहे. गुणवत्तेच्या ष्टीने ते सर्वश्रेष्ठ आहे. आंब्याच्या सालींमध्येही विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. विटॅमिन सी अभावी होणाऱ्या रोगांत आंब्याचे सेवन अत्यंत उपयोगी असतं. हिरड्यांना सूज, रक्‍तस्राव, दंतक्षय, दातांना कीड आणि पायोरियाच्या तक्रारींवर तसंच मुलांना होणाऱ्या स्कर्वी रोगात आंब्याचा चांगला उपयोग होतो.

आंबा हा मधुर, शक्‍तिवर्धक आणि स्निग्ध असतो आणि वीर्य व तेज वाढवितो. आंबा डोळे व हृदयविकारावर तर उपयोगी आहेच पण त्यामुळे रक्‍तविकारही दूर होतो. डोळ्यांचा कमकुवतपणा, पापण्यांची जळजळ वा खाज येणे, रातआंधळेपणासारख्या तक्रारींवर आंबा उपयुक्‍त ठरतो. आंब्यातील आंबटपणातही टार्टरिक आम्ल, मॅलिक आम्ल, सायट्रिक आम्ल, फोलिक आम्ल व ग्लाईकोकॉलिक आम्ल असते. वाढत्या वयात मुलांसाठी सायट्रिक आम्ल उपयोगी असते.

म्हणजेच मुलांनी कैऱ्या खाणं फायदेशीर ठरते. आंब्याचा आंबटपणा हा क्षारवर्धक असतो. कारण त्यात (सोडियम पोटॅशियम) क्षारांची रेलचेल असते. संधिवात, गुडघेदुखी, आमवात, सायटिका, आंतड्याचे आजार, उच्च रक्‍तदाब व कातडीच्या रोगांवर आंब्याचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण रक्‍तात क्षारांचे प्रमाण कमी झाल्याने अशा तक्रारी उद्‌भवतात. पिकलेल्या आंब्यात गॅक्‍टोज व पेंटिस साखर असते. हृदयविकार, अन्न शरीराला न लागणे, कमी वजन असणे इ. तक्रारी ज्यांना आहेत त्यांनी आंब्याचे सेवन जरूर करावे. संग्रहणी, पित्ताशयाच्या तक्रारी वा अन्य रोगांवर पिकलेला आंबा उपयुक्‍त आहे.

निरोगी शरीरासाठी आंबा कल्प – आयुर्वेदिक ग्रंथात व नैसर्गिक चिकित्सा जगतात या कल्पाला पुष्कळ महत्त्व आहे. कमीत कमी सहा आठवडे सेवन करणं म्हणजे कल्प. दूध, दही, मनुका, कलिंगड वा टरबूज, बेल, मध इ. अनेक प्रकारचे कल्प तयार करता येतात. आंबाकल्पही अत्यंत फायदेशीर आहे. शारीरिक व्याधींचा मुळासकट नाश हा कल्पामुळे होऊ शकतो. मात्र, यात संयम व नियमाचं पालन करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

चुकीच्या आहार सेवनामुळे शरीरात रोग निर्माण होतात हे सर्वश्रुत आहे. कल्पाच्या माध्यमातून जेवण संतुलित व जीवन संयमित करण्यात येऊन पचनशक्‍तीला यथाशक्‍ती आराम देण्यात येतो. यामुळे रोग्याच्या शरीरात असलेल्या स्वास्थ्यविरोधी तत्त्वांचा नाश करण्याची शक्‍ती येते. शरीर स्वस्थ व निरोगी होतं. आंबाकल्पाचा पुष्कळ उपयोग आहे. आंब्याबरोबर दूध पिणं फायदेशीर असतं. आंबा व दूध एकत्र घेतल्यास चौरस आहाराचा लाभ मिळतो. आंब्यात असलेली प्रथिनं व फॅटची कमतरता दुधामुळे पूर्ण होते. दुधात क्षार, विटॅमिन व नैसर्गिक मिठाचे प्रमाण अधिक व मुबलक असते.

आंबाकल्पाचे अनेक फायदे आहेत. यामुळे चेहऱ्यावर, कांतीवर तेज व शरीरातील ताकद वाढते, त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. आंबाकल्पामुळे शरीर निरोगी होतं. चोखून खाल्लेला आंबा शीतल, हलका, रेचक, वातपित्तनाशक, बलवीर्य व रूचिवर्धक असून डोळ्यांनाही फायदेशीर असतो. आंब्याचा रस शुक्राणू वाढवितो व शुक्राणूंचे विकारही दूर करतो.

हृदयविकार टाळण्यासाठी कोयीचा उपयोग – कोय हा आंब्याचा आणखी एक उपयुक्‍त घटक आहे. या वाळवलेल्या कोयींचे महत्त्व वाढले आहे. उलटी, अतिसार व हृदयविकाराचं प्रमाण कमी करण्यासाठी कोयींचा उपयोग केला जातो. कोयींचे तेल तोंडाच्या विकारावर उपयुक्‍त असतं. आंब्याच्या कोयीत विपुल प्रमाणात प्रथिने व कार्बो-हायड्रेटस असतात. यात आढळणारी प्रथिने मका, जव, बाजरी व ज्वारी यासारख्या धान्यात आढळणाऱ्या प्रथिनांप्रमाणे फायदेशीर असतात.

पशूंच्या चाऱ्यातही त्यांच्या आरोग्यासाठी कोयींचा उपयोग उत्तम होऊ शकतो. मानवाच्या अन्नातही आंब्याच्या कोयींचा उपयोग गहू व अन्य कोणत्याही पिठात मिसळून करता येऊ शकतो. याचा स्टार्चही तयार करतात. त्याच्या गरापासून लोणीही तयार केलं जाते. आंब्याच्या सुक्‍या गरात सहा ते बारा टक्‍के स्निग्धता असते. गर्भाशयातील रक्‍तस्राव, श्‍वेतप्रदर, रक्‍तीे मूळव्याध व मधुमेह या सारख्या रोगात कोयीच्या गरांचे चूर्ण देतात. आंब्याच्या झाडाचं लाकूड, त्याची आतील साल व पानेही औषधीदृष्ट्या उपयुक्‍त असतात.

आंब्याचा औषधी उपयोग – आंब्याच्या फळापासून मुळापर्यंत प्रत्येक भागांचा औषधामध्ये उपयोग होतो. याच्यामुळे आरोग्य व बल प्राप्त होते. पिकलेला आंबा पचायला जड, स्निग्ध, पौष्टिक व वीर्यवर्धक आहे. आंब्यामुळे शरीरामध्ये रक्‍त व मांस यांची वाढ होते. प्लीहा वाढली असल्यास आंब्याचा रस मधाबरोबर घेतल्याने कमी होते. कच्चा आंबा (कैरी), मांसाहार, मासे याच्या अजीर्णावर खावा. कैरीपासून बनविलेले पन्हे आल्हाददायक व ताजेतवाने करणारे आहे. मद्याचे दुष्परिणाम घालवण्यासाठीदेखील या पन्ह्याचा उपयोग होतो. कैरी वाळवून त्याचे चूर्ण बनवितात. त्याला ‘आमचूर’ म्हणतात. स्वयंपाकामध्ये चिंच किंवा टोमॅटोऐवजी आमचूर वापरणे अधिक लाभदायक आहे. त्याने पचन सुधारते. कैरी भाजून त्याचा गर अंगाला लावल्याने घामोळे, पायाच्या भेगा कमी होतात. आंब्याचा रस वाळवून केलेली आंबापोळी खाल्याने पोटातील जळजळ व उलट्या असा पित्ताचा त्रास कमी होतो.

आंब्याची कोय (बाठ)फोडल्यावर त्यातून निघणारा तुरट चवीचा गर खूप औषधी आहे. जेव्हा आंतड्याची शक्‍ती क्षीण होते, वारंवार जुलाब होणे यावर कोय भाजून खातात. तसेच कोय व तांदूळ एकत्र शिजवून त्याची खीर रोज घ्यावी म्हणजे जुलाबाचा त्रास कमी होतो. मूळव्याधीतून किंवा गर्भाशयमार्गातून अधिक रक्‍तस्राव होत असल्यास आंब्याच्या कोयीचे चूर्ण तांदळाच्या धुवणाबरोबर घ्यावे. कोयीचे चूर्ण किंवा अख्या कोयीचा गंध नाकाला दिल्यास किंवा चूर्णाची चिमूट नाकात सोडल्यास, घोळणा फुटून होणारा रक्‍तस्राव थांबतो. कोयीचे चूर्ण दुधामध्ये मिसळून डोक्‍यास लावल्यास कोंडा, खपल्या असे केसांच्या मुळाशी होणारे रोग कमी होतात.

आंब्याची साल, त्याची कोवळी पाने व झाडाची साल यांचा काढा घेतल्याने उष्णतेचे विकार कमी होतात, रक्‍तस्राव थांबतो, तोंड येण्याचे प्रमाण हा काढा घेतल्याने कमी होते. आंबा जरी बहुगुणकारी असला तरी त्याच्या अतिसेवनामुळे अंगावर फोड येणे, गळू येणे, भूक मंदावणे, चेहऱ्यावर पुरळ येणे इ. त्रास होऊ शकतात. म्हणून आंब्याचे अतिसेवन टाळावे. अनेक रोगांवर एकच औषध असलेला आंबा कोणत्या ना कोणत्या कारणांने त खायला हवा.
– सुजाता गानू

Leave A Reply

Your email address will not be published.