झाडे लावल्याने 10 कलमी गुन्हा

पुणे – एकीकडे झाडे लावण्यासाठी शहरातील शेकडो पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, शासकीय यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. अगदी लाखो रुपये खर्चकरून शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे. मात्र, त्याचवेळी वृक्षारोपण करणाऱ्या एका व्यक्तीला थेट कोर्टाची पायरी गाठावी लागली असल्याची एक अनोखी केस खडकी कोर्टात सुरू आहे. सोसायटीच्या “ओपन स्पेस’मध्ये केलेल्या वृक्षारोपणाला विरोध करत सोसायटी कमिटीच्या सदस्यांनी या व्यक्तीवर एक दोन नव्हे तर तब्बल दहा कलमी गुन्हा दाखल केला आहे.

धानोरी येथील एका सोसायटीतील सदस्य असलेल्या या व्यक्तीने सोसायटीच्या “ओपन स्पेस’ म्हणून राखीव ठेवण्यात आलेल्या जागेत स्वखर्चाने सुमारे 65 झाडे लावली. वृक्षारोपणासाठी जागेची साफसफाई, माती, बोअरवेल यासाठी आवश्‍यक असणारा सर्व खर्चदेखील या व्यक्‍तीने केला. तसेच, बांधकाम व्यावसायिक, महानगपालिका अशा सर्वांची रितसर परवानगी देखील घेण्यात आली होती. तसेच, या वृक्षारोपणाची नोंद महापालिकेच्या लॅटीट्युड-लॉन्जट्युड अहवालात नोंदविली गेली आहे. मात्र, वृक्षारोपणाच्या एक वर्षानंतर सोसायटीचे अध्यक्ष आणि कमिटी मेंबर यांनी या वृक्षारोपणाला विरोध दर्शविला. तसेच, झाडांना पाणी घालण्यासाठी मज्जाव करण्यात आला. हे प्रकरण इतके वाढले की वृक्षारोपण करणाऱ्या व्यक्‍तीविरोधात सोसायटीच्या अध्यक्षांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 10 कलमी तक्रार दाखल केली आहे. नुकतेच या संदर्भातील एक पत्र महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणास प्राप्त झाले असून, या झाडांचे संवर्धन करावे, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून एखादी व्यक्ती वृक्षसंवर्धन करत असेल, तर त्या व्यक्तीला पाठिंबा दिलाच पाहिजे. प्राधिकरण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन, त्या वृक्षांची पाहणी करेल आणि त्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेईल.
– धनंजय जाधव, सदस्य, प्राधिकरण समिती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.